“सीबीएससी राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धांमधे आठ सुवर्णपदकांसह पंधरा पदके मिळवत ठाण्याच्या मुलींचे घवघवीत यश”
सीबीएससीतर्फे (केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड) शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धांमध्ये, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू व कोच पूजा सुर्वे यांच्याकडे रिदमिक जिमनॅस्टिक्स शिकणाऱ्या ठाण्याच्या चार मुलींनी बाजी मारली आहे. खेलगाव पब्लिक स्कुल, अलाहाबाद इथे आयोजित केलेल्या या चार दिवसीय स्पर्धांमधे देशभरातून सीबीएससी शाळांमधले सुमारे ८० संघ उतरले होते आणि आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक व रिदमिक जिम्नॅस्टिक अशा दोन्ही प्रकारच्या स्पर्धा इथे घेतल्या गेल्या. ठाण्याच्या ‘द फिनिक्स जिमनॅस्टिक्स ऍकेडमीत’ शिकणाऱ्या मुलींनी आठ सुवर्ण, सहा रौप्य व एक कांस्य अशी तब्बल पंधरा पदके मिळवत रिदमिक जिम्नॅस्टिक या खेळातले आपले वर्चस्व दाखवून दिले.
रिदमिक जिम्नॅस्टिक या खेळात रोप, बॉल, हूप, रिबन आणि क्लब अशा पाच राऊंडस तर लहान वयोगटासाठी फ्रीहँड राउंड असते. एकोणीस वर्षाखालच्या वयोगटात (U19 ) डीएव्ही स्कुल, ठाणे इथल्या किमया कदम हिने बॉल ( सुवर्ण ), हूप (रौप्य), रिबन (सुवर्ण), क्लब (रौप्य) व ऑल राउंड मध्ये सुवर्ण पदक मिळवले. तर श्रुती महाडेश्वर हिने हूप (सुवर्ण), रिबन (रौप्य), क्लब (सुवर्ण) व ऑल राउंड मध्ये रौप्य पदक मिळवले. अकरा वर्षाखालच्या वयोगटात (U11 ) न्यू होरायझन पब्लिक स्कुल, ऐरोली इथल्या स्पृहा साहू हिने बॉल (रौप्य ), क्लब (रौप्य) तर ऑल राउंड मध्ये कांस्य पदक मिळवले. तर आंतरराष्ट्रीय रिदमिक जिम्नॅस्ट संयुक्ता काळे हिने बॉल, क्लब आणि ऑल राउंड या सर्व प्रकारात सुवर्ण पदक मिळवत घवघवीत यश मिळवले.
या चारही जणी, कोच पूजा सुर्वे यांच्या ‘द फिनिक्स जिमनॅस्टिक्स ऍकेडमी’ मध्ये रिदमिक जिमनॅस्टिक्सचे प्रशिक्षण घेत असून आपल्या उत्कृष्ठ कामगिरीमुळे त्यांनी अलाहाबाद मध्ये सर्वांचीच वाहवा मिळवली आणि या खेळामध्ये ठाण्याचे नाव उंचावले आहे.
Comments