राज्यस्तरीय रिदमिक जिम्नॅस्टिक स्पर्धांमध्ये ठाणे महापौर चषक ठाण्यातल्या मुलींकडे!
ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशन आणि महाराष्ट्रराज्य अमॅच्युअर जिम्नॅस्टिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच ठाण्यात महापौर चषक राज्यस्तरीय रिदमिक जिम्नॅस्टिक स्पर्धांचे आयोजन झाले होते. या स्पर्धामध्ये एकूण ६९ सुवर्णपदकांपैकी ५१ पदकांवर नाव कोरत ठाण्याच्या रिदमिक जिम्नॅस्टनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
२६ आणि २७ नोव्हेंबर रोजी ठाण्यात ढोकाळी येथील श्री. शरदचंद्र पवार मिनी स्पोर्ट कॉम्प्लेक्स मध्ये आयोजित केलेल्या या राज्यस्तरीय महापौर चषक स्पर्धेत ठाणे, पालघर, मुंबई सर्बब, पुणे, नाशिक अशा अनेक जिल्ह्यातून संघ उतरले होते. आठ वर्षांखालील गट, दहा वर्षांखालील गट, बारा वर्षाखालील गट,ज्युनिअर गट आणि सिनिअर गट अशा विविध वयोगटात खेळणाऱ्या मुलींनी आपल्या खेळाचे सुंदर प्रदर्शन केले.
ठाणे जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशनचे श्री. ढवळे ( ऑर्गनायझिंग सेक्रेटरी ), महाराष्ट्रराज्य अमॅच्युअर जिम्नॅस्टिक असोसिएशनच्या सेक्रेटरी सविता मराठे (कॉम्पिटिशन डायरेक्टर), आणि आंतरराष्ट्रीय कोच पूजा सुर्वे ( स्पोर्ट्स कोऑर्डिनेटर ) यांनी तसेच ठाणे महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या स्पर्धाच्या आयोजनात महत्वपूर्ण योगदान दिले. ठाणे महानगर पालिकेतर्फे सर्वच खेळाडूंची जेवण्याची आणि राहण्याची उत्तम सोय केली गेली होती. बाहेरून येणाऱ्या खेळाडू आणि कोचनी या सर्व आयोजनाची खूप प्रशंसा केली. ठाण्याचे महापौर श्री. संजय मोरे यांच्याकडून लाभलेल्या सहकार्यामुळेच या स्पर्धाचे यशस्वीरीत्या आयोजन करता आले.
आंतरराष्ट्रीय पद्धतीप्रमाणे जिम्नॅस्टने आपला खेळ सादर केल्यावर ती ‘किस अँड़ क्राय कॉर्नर’ मध्ये आपल्या गुणांची वाट पाहात थांबते. जजेसनी गुणांकन केल्यावर एकूण किती गुण मिळाले हे मोठ्या स्क्रीनवर दाखवले जाते. या राज्यस्तरीय स्पर्धासाठीही अशीच आंतरराष्ट्रीय पद्धत वापरून मोठ्या स्क्रीनवर प्रत्येक खेळाडूचे गुण दर्शवण्यात आले. त्यामुळे प्रत्येक सेट नंतर आपले गुण किती हे प्रेक्षकांबरोबरच खेळाडूंनाही समजत होते. या सगळ्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर कशाप्रकारे गुण दाखवले जातात हे पहाता आलं आणि त्याचा भावी आंतरराष्ट्रीय खेळाडूंना नक्कीच फायदा होईल असा कोच पूजा सुर्वे यांचा विचार त्यामागे होता.
रिदमिक जिम्नॅस्टिक या खेळात रोप, बॉल, हूप, रिबन आणि क्लब अशा पाच राऊंडस तर लहान वयोगटासाठी फ्रीहँड राउंड असते. या सगळ्या राउंडमध्ये मिळून एकूण ६९ सुवर्ण तर तितकीच रौप्य व कांस्य पदके खेळाडूंना दिली गेली. यातली तब्बल ५१ सुवर्णपदके, २२ रौप्य पदके आणि ५ कांस्य पदके ठाण्याच्या रिदमिक जिम्नॅस्टनी पटकावत महापौर सुवर्णचषकही प्राप्त केला. या ठाण्याच्या सर्व मुली आंतराराष्ट्रीय कोच, खेळाडू आणि शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त पूजा सुर्वे यांच्याकडे प्रशिक्षण घेतात.
Comments